तुमचा आमचा असतो तसाच त्यांचाही होता एक मस्त व्हाट्स अप ग्रुप, दूर असून पण सर्वांना जवळ आणणारा म्हणून "हम साथ साथ है". आपल्यासारखेच त्यात प्रत्येकाचे कौतुक, वाढदिवस इ. अगदी साग्र-संगीत व्हायचे. शिवाय वर्षातून एकदा तरी भेटायचे असा नियम होता त्यांचा. सगळेच जण आपापल्या व्यापात असायचे त्यामुळे ही भेट अगदी वेगळ्या ठिकाणी व्हायची.
मागच्या वेळेसची महाबळेश्वर मधली भेट नुसती आठवली तरी मन मोहरून उठायचे. आपल्या माणसांसोबत वेळ घालवणे म्हणजे स्वर्ग सुख हाच विचार तात्या करत होते.
तितक्यात त्यांचा फोन वाजला. आबांचे नाव फोनवर वाचले आणि आधीच खुश असलेले तात्या अतीव आनंदाने फोन उचलून बोलायला लागले. मात्र आबांचा गंभीर आवाज ऐकून तात्या शांत पणे ऐकू लागले. सकाळच्या गडबडीत असलेला सचिन, तात्यांचा मुलगा वडिलांचा चिंतित चेहरा पाहून तिथेच उभा राहिला. तात्यांनी फोन ठेवला आणि सांगायला लागले, अरे चिन्मयचा अॅक्सिडेंट झालाय. आता पैसे काढणे वैगेरे सुधरत नाहीये त्यांना त्यामुळे आतासाठी पैशांची आवश्यकता आहे. ठीक आहे मी जातो तिकडे जाताना पैसे काढून घेतो आणि आणखी काही मदत हवीये का ते बघतो, सचिन म्हणला. तात्यांचा संस्कारातला सचिन हेच बोलणार हे तात्यांना माहिती होते. पण तात्यांनी त्याला आज होकार दिला नाही. ते म्हणाले थांब रे जरा तू आवर तोपर्यंत मी सांगतो काय करायचे ते.
तात्या विचार करायला लागले, पूर्वी सगळी भावंड एकाच गावात होतो. कोणावर काहीही संकट आल की सगळे आपले संकट असल्याप्रमाणेच साथ द्यायचे. आर्थिक परिस्थिती फार कोणाचीच बरी नसायची पण सर्वजण मदतीला पुढे असायचे. आता तर संकट येतात आणि जातातही सगळ्यांना खबर सुद्धा नसते. काही वेळा पूर्वीच आपल्या सामाजिक माध्यमांमुळे दूर राहूनही जवळ आलेल्या कुटुंबाबद्दल कौतुक वाटणार्या तात्यांना कुटुंब पाहिल्यासारखे अजूनही जवळ नाही हे सतावू लागले.
तात्यांनी ग्रुप मध्ये मेसेज टाकला. चिन्मयचा अपघात झाला आहे. त्याचाच अपघात झाल्यामुळे त्याचे पैसे काढता येणार नाहीत त्यामुळे सर्वांनी आता मदत करावी. मदत कोणा एकाकडून नकोये सर्वांनी थोडी थोडी करावी. मेसेज वाचून सचिन तात्यांकडे आला आणि हे काय तात्या मी आहे मदतीला खंबीर कशाला सर्वांना विचारत आहात असे म्हणायला लागला. तात्यांनी त्याला शांत केले आणि समजावून सांगितले, हे बघ आपल्या माणसाच्या संकटात आपण सगळ्यांनीच खंबीरपणे पाठीशी असायला पाहिजे. जस मी तुला सगळ्यांना आपल मानायला शिकवले तस सगळेच मानतात न हे पहायचे मला. पैशांचा तसा प्रॉब्लेम आबांना नाहीये. मात्र मानसिक बळ, कुटुंब सोबत आहे ही भावना त्यांना मिळेल.
तात्यांच बोलणं संपलंही नव्हतं की ग्रुप वरती मेसेजचा पाऊस पडत होता. तात्यांनी फोन हातात घेतला आणि वाचायला लागले. "अरे काही होत नसते आपल्या चिन्मय ला", "मी येऊ का तिकडे", "तिथला डॉक्टर माझ्या ओळखीतला आहे. काळजी नको", "डबा पाठवते हो मी", असे आणि कितीतरी मेसेज.
इकडे सचिन आला, बघा तात्या तुम्ही उगीच चिंतेत असतात आपले कुटुंब पाहिलेसारखेच आहे. हाक मारायला उशीर सगळे हाजिर! मला पैसे पाठवले आहेत सगळ्यांनी आणि लगेच जा म्हणत आहेत. आणि हो तात्या, विक्या आणि सोम्या निघालेत इकडे. आता तरी जाऊ ना मी! तात्यांनी त्याला मानेनेच होकार दिला. आज तात्यांना अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. घरातल्या विठ्ठलापुढे हात जोडून ते कितीतरी वेळ उभे होते जणू त्याचे आभारच मानत होते "हम साथ साथ है" साठी!!
मुग्धा कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा