सारिका ताईच्या मनाची खूप घालमेल चालू होती. हा मधूमेह काय मागे लागला कोणी उपासच करू देत नाहीत. बाकीचे सगळे सोडले, पण एकादशी! ती पण मोठी!! ही कशी सोडू त्या विचार करत होत्या. एकादशी अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. मात्र घरच्यांच्या विरोधात जाऊन उपास करणे शक्यच नव्हते. आईला रुखरुख वाटू नये म्हणून घरात कोणीच एकादशी करायची नाही असे फर्मान यश ने सोडले होते.
आता देखील आईच्या मनात काय आहे हे ओळखणारा यश आईला बोलायला लागला, आई किती दिवस झाले इडल्या नाही केल्या. परवा मस्त बेत करू. मी ऑफिस मधून लवकर येतो आणि मदत करतो. तो असे का म्हणतो आहे हे न समजण्या इतक्या काही सारिका ताई भोळ्या नव्हत्या. पण पोराची आपल्यासाठीची काळजी सुद्धा त्यांना समजत होती.
आप्पा दोन दिवस झाले जरा शांत शांत होते. एरवी एकादशीला त्यांची नुसती धावपळ असायची. पण या वर्षी मात्र आप्पा वेगळ्याच भावविश्वात दिसत होते शंभरी गाठलेले आप्पा फक्त वयाने म्हातारे होते अन्यथा मोठा उत्साही माणूस! एकादशी म्हटल्यावर तर विचारुच नका. त्यांच्या पेक्षा वीस वर्षानी लहान अश्या त्यांच्या अर्धांगींनी सगळे त्यांना माई म्हणायचे. माई आज जुन्या आठवणीत होत्या. त्यांना आठवले पक्के कोकणी असलेल्या कुटुंबात त्या आल्या तेव्हा त्यांना हे समुद्री मांसाहारी पदार्थ ना जमायचे ना आवडायचे. मात्र शिकून घेणे गरजेचे होते. मात्र तशी वेळच आली नाही.
एकदा व्यवसायाच्या कामासाठी आप्पांना पंढरपूरला जायचे होते. दिवस / वार न बघता काम हेच दैवत मानणारे आप्पा लगेच पंढरपूर कडे निघाले. दुसर्या दिवशी एकादशी होती. एकादशी म्हटल्यावर पंढरपूरला दुसरे कोणते काम होणे नाही, हे फारसे देव-देव न करणार्या आप्पांना उमजलेच नाही. काम तर बाजूला राहिले मात्र जेवणही नाही, त्या दिवशी त्यांना उपासच घडला. माहिती नाही कसे पण नकळत त्यांचे पाय मंदिरा कडे वळले. रात्रभर वारीला लागून विठ्ठल दर्शन झाल्यावर कोणालाही मिळते तेच समाधान त्यांना मिळाले. झाले माणूस वापस आला तोच गळ्यात तुळशीची माळ घालून. मग काय तेव्हापासून घरात कधीच मांसाहार बनलाच नाही. माई तर म्हणायच्या विठ्ठलाने च मला वाचवले.
त्यांनंतर कधीच आप्पांची वारी चुकली नाही. अगदी आता आता जाणे होत नव्हते तर त्यांच्या या छोट्याश्या गावात जणू पंढरपूर अवतरायचे. यावर्षीही तशीच जय्यत तयारी आणि गावातल्या विठ्ठल मंदिराचा आरतीचा मान नेहमीप्रमाणे आप्पांच्या घरच्यांना!
शांत शांत आप्पांना पाहून घरच्यांच्या छातीचा ठाव चुकत होता. पण आप्पांच्या चेहर्यावरचा प्रसन्न पणा काहीही अघटित होणार नाही याची ग्वाही देत होता.
एकादशी उद्यावर येऊन ठेपली. तसा आप्पांचा थोरला मुलगा तुकाराम त्यांना म्हणाला, आप्पा काय झाले तुम्हाला. उद्यावर आली एकादशी आणि तुम्ही घरातच. बघा जरा नेहमीप्रमाणे सर्व होतेय की नाही मंदिरात ते. तसे आप्पा अगदी दिलखुलास हसले, “छानच होणार हो सगळे. पण हे बघ राम यावर्षी माझी एक इच्छा आहे ”. हे ऐकताच राम आप्पांकडे बघून म्हणला, तरीच स्वारी शांत शांत आहे तर. बालहट्ट आणि वृद्ध हट्ट कोणाला चुकलाय! बोला ना आप्पा काय करायचे ? विठोबा रखूमाई ला दागिने की कपडे ? तसे आप्पा म्हणाले यातले काहीही तो मागत नसतो. पण यावर्षी इथे आपल्याकडे सगळ्यांना बोलावं उद्या साठी. सगळे म्हणजे कोण ते समजून राम म्हणाला, काहीपण आप्पा उद्या साठी आज निरोप धाडून का कोणी येत असते काय. आप्पा पण जिद्दीला पेटलेले मला काही माहिती नाही हव तर माझी प्रकृती बिघडली असे सांगून बोलावून घे. पण मला उद्याच्या आरतीला सगळेच हवेत. आप्पांना आणि त्यांच्या विठ्ठलभक्तीला ओळखून असलेला राम त्वरित माई कडे आला आणि आप्पा जे बोलले ते त्याने सांगितले तस माई म्हटल्या त्यांना विरोध कोणी करू शकते? काय लाव तू फोन सर्वांना.
आत्या , काका , मामा आणि सर्व भावंड इतके सगळेजण कसे ऐकणार हा त्याला प्रश्नच होता. पण तरी त्याने सर्वांना फोन लावले.
सारिका ताईंचा फोन वाजला. राम काकाचा फोन म्हणजे काहीतरी महत्वाचे काम असणार असा विचार करतच त्यांनी फोन कानाला लावला. सरू उद्याच्या आरतीच्या आधी गावी ये, इतकेच बोलून काकाने फोन ठेवला. तसा सारिका ताईंनी त्यांच्या आईला फोन लावला. त्यांनाही इतकाच फोन आला होता.
आरतीच्या वेळे आधी अगदी सगळे हजर होते. तितक्यात कोणीतरी म्हणाले सरू नाही आली अजून आणि तिचा फोनेपन नाही लागत आहे. अजून थोडा वेळ वाट पाहण्याचे ठरले. इतक्या वर्षानी एकत्र आल्याने सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या. भरल्या घराकडे आप्पा अगदी कृतकृत्य होऊन पाहत होते. आजही एका हाकेला सगळे आले यामुळे ते समाधानी होते.
इतक्यात गाडी वाजली. हो सारिका ताईच आल्या होत्या. आपल्या आजोबांच्या आप्पांच्या गावी कितीतरी वर्षांनी आल्या होत्या त्या. चेहरा अगदी पडलेला होता. आप्पांच्या पाया पडायला वाकल्या तसे आप्पा बोलले, सरू विठ्ठल मनात असावा, आचरणात असावा. उपवासाने त्याची आठवण प्रखर होते असे म्हणतात. पण जिथे तू सतत नामस्मरण करतेस तिथे बाकी कशाची गरज नाही. सारिकाताईंनी चमकून वर पहिले, आप्पांना कसे समजले आपल्या मनातले अश्या विचारात त्यांनी आप्पांना निरखले. सावळा रंग त्यांच्यावर खुलून दिसत होता आणि चेहर्यावर एक विलक्षण चमक दिसत होती.
तिकडे घंटानाद सुरू झाला. टाळ, मृदुंगाच्या नादात आरती झाली आणि त्याक्षणी इकडे आप्पांनी देहत्याग केला.
