बुधवार, ३ जून, २०२०

निसर्ग, वादळ आणि मानव

लॉक डाऊन मध्ये  उशिरा का होईना आंब्याची पेटी घरपोच मिळाली आणि गंगेत घोडे न्हाले. त्यातील वाळलेले गवत/काड्या आम्ही टेरेसच्या पलीकडे ठेवले. कारण एरवी झाडूची एक काडी सुद्धा पक्षी घेऊन जातात. म्हणलं चला तेवढेच त्यांना घरटं बांधायला उपयोगी येतील. ते येतील याची काही खात्री नसताना अगदी एका दिवसात सगळे गवत/ काड्या गायब! समोरच्या झाडावर एक घरटं होतं. त्यासाठीच ते वापरल्या असतील असे मी मनोमन गृहीत धरलं. 

रोजच्या व्यापात क्वचितच या घरट्याकडे माझे लक्ष जाई. मात्र आज सकाळपासून विजेचा लपंडाव सुरू असताना, दुपारनंतर मात्र सुसाट वाऱ्यासोबत विजेने पळवाट धरली. त्यात सकाळपासून इतका अंधारून आलेलं. त्यामुळे कधी खिडकीतून तर कधी टेरेस मधून माझं वातावरणाचा अंदाज घेणे चालूच होते. 

        अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि मी ते पाहायला बाहेर आले. नजर अगदी सहजच घरट्याकडे गेली. वाऱ्याने झाडं पूर्ण वाकायची आणि तेवढ्याच वेगाने वापस यायची तरीसुद्धा ते घरटे शाबूत होतं. नक्कीच त्यातली पक्षी केव्हाच उडून गेली असणार. पण पानांच्या आड फारसं समजत नव्हतं. 


        काही वेळाने पुन्हा बाहेर नजर गेली. वारा थोडा कमी झाला होता. त्यामुळे पाना आडून मला आता घरटे स्पष्ट दिसू लागले आणि खरच मला नवल वाटले. कारण त्या घरट्यावर पक्षीणसुद्धा होती. वाऱ्याचा जोर पुन्हा वाढला. आता ती उडून जाते का हे मला पहायचे होते आणि माझे अगदी बारीक लक्ष होते तिच्यावर. तिने इतक्या वादळात पण ते घरटं मुळीच सोडलं नाही. माझं मन तिच्यापाशी जाऊन पोहचला आणि तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागल.

ती जणू  वादळाला म्हणतेय,


जोर तुझा हा जरी दांडगा, 

                 तवसम मज इच्छाशक्ती..

जाशील सारे जरी तू पांगवून,

            छाया माझी मम् घरट्यावरी..

 किती जरी देशील आव्हाने तू,

        उभी इथे मी तत्पर राहूनी ..

मिळेल शिकवण धैर्याची,

          जाशील जेव्हा तू निघूनी..


स्वतःवर संकट असताना देखील ती आता मात्र या रुद्र रुपी वादळाला इतरांसाठी विनवतेय.


विणवू किती तुला मी,

तू सौम्य हो जरा रे .

जगवायला जगाला,

तूज थांबनेच आहे .


आता मात्र ती मानवा वरचा राग त्याच्याच भाषेत काढतेय..


आता तरी मानवा जागा होशील काय ,

ग्लोबल वॉर्मिंगच्या हाका जरा ऐकशील काय..


उद्योगांना वाढवून केलीस प्रगती तू,

रसायनांचे पाणी आणि कार्बन डायऑक्साइडचा धूर..

नदीमधले दूषित पाणी रोखशील काय,

ग्लोबल वॉर्मिंगच्या हाका जरा ऐकशील काय..


गाड्यांचा धूर आणि डीजेचा बेसूर,

वायु प्रदूषणाचा वाढतोय बघ जरा असुर ..

शुद्ध हवेसाठी झाडे लावशील काय 

ग्लोबल वॉर्मिंगच्या हाका जरा ऐकशील काय..


सुधारला नाहीस आता तर निसर्ग घेईल बघून

धरणीवरून मग जाशील मानवा निघून

आता तरी मानवा प्रदूषणाला आळा बसवशील काय

ग्लोबल वॉर्मिंगच्या हाका जरा ऐकशील काय..


तिची इच्छाशक्ती तर खरच दुर्दम्य दिसतेय. मात्र मानवाच्या चुकांची शिक्षा हे मूके जीव भोगत आहेत. तेव्हा आपण अंतर्मुख होणे आता गरजेचे आहे..


मुग्धा कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा