बुधवार, ३ जून, २०२०

केस वाढी साठी घरगुती उपाय.


लग्नात सुंदर केशरचना(hairstyle) करायची म्हणजे केस लांब हे असायलाच हवे. लग्न ठरले आणि मनू केस वाढवण्याच्या मागे लागली . पण केस पण तसलेच जिद्दी पटपट वाढतील ते कसले ! हेअर ग्रोथ शॅम्पू झाले तेल झाले पण म्हणावे तसे काही वाढेणात.
मग काय वैतागलेली मनू तिच्या आजीपाशी जाऊन बसली. "काय झाले नवरीला" आज्जीने थट्टेने विचारले. तसे मनूने तिच्या केसांचा पाढा वाचला. हसून आज्जी म्हणाली, आता जरा मी सांगते त्या स्वस्त आणि मस्त गोष्टी अंमलात आण आणि बघ लग्नापर्यंत कसे केस वाढतात ते.
तर मनूच्या आज्जीच्या बटव्यातली ही गम्मत आता तुम्ही पण जाणून घ्या.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल ! झोपताना खोबऱ्याच्या तेलाने छान मालिश करायची आणि दुसऱ्या दिवशी शिकेकाई अथवा सौम्य शॅम्पूने केस धुवायचे पहा कंडिशनरची गरज पण पडणार नाही. असे आठवड्यातून दोनदा तरी करायचे. मात्र दररोज शॅम्पू करणे टाळावे.
कधी खोबरेल तेलामध्ये आपल्या बागेमधली कोरफड(नसेल तर बाजारात कोरफड जेल/aloe Vera gel मिळते तीही चालेल) आणि व्हिटॅमिन इ च्या गोळ्या मिसळायच्या आणि कोमट करून मस्त चंपी करायची. याने केसांमधील त्वचेतला रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे केसवाढीला चालना मिळते.जास्वंदाच्या फुलांना खोबरेल तेलात टाकून उकळून गाळून घ्यावे हे तेल केस वाढीस उत्तम असते. केसांचे शेंडे वेळोवेळी कापल्याने केस लवकर वाढतात. 
केस फारच कोरडे वाटत असतील तर कंडिशनिंग नक्की करायचे. केसांमध्ये कोंडा असेल तर वेळीच त्यावर उपाय करावा. तसेच केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर त्यावर देखील लक्ष द्यावे. 
आजी मनूला सांगत असतानाच तिची मावशी आली. आजीबरोबरच मावशीने देखील बरीच माहिती दिली,
बर का मनू आजीने सांगितलेले रामबाण उपाय तर तू करच पण याशिवाय देखील बऱ्याच गोष्टी असतात हो.
आपल्या केसांची वाढ बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते जसे की आपला आहार, झोप, अनुवंशिकता, ताणतणाव, चुकीची जीवनशैली, व्यसनं इ. 
तेव्हा सर्वप्रथम पुरेशी झोप, वक्तशीर आणि प्रथिनयूक्त आहार, भरपूर पाणी यांची सवय लावायची.
आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असेल तर केस लवकर वाढत नाहीत तेव्हा प्रथिनांचा आपल्या आहारात पुरेसा समावेश असावा.त्यासाठी जेवणामध्ये अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य यांचे नियमित सेवन करायचे. अंड्यांमध्ये प्रथिनांशीवाय बायोटिनही असते .बायोटिन हे केस वाढीसाठी अनुकूल आहे . ज्यांना अंडी अथवा मांसाहार चालत नाही त्यांच्यासाठी मोड आलेली कडधान्य,पनीर, पालेभाज्या हे सगळे पर्याय आहेतच! कडधान्यामध्ये प्रथिनांशीवाय जीवनसत्व क असते त्यामुळे केसवाढीला मदत होते. तसेच पालकामध्ये देखील लोह आणि जीवनसत्व अ आणि क यांचा समावेश आहे.यामुळेच पालकाच्या भाजीच्या सेवन हे नुसते केस वाढीसाठी नाही तर शरीरातील हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी देखील फायद्याचे आहे.
हे झाले आहाराचे आणखी छोट्या छोट्या गोष्टी नक्की अंमलात आणायच्या.. जसे की उन्हात जाताना तसेच धुळीत जाताना केसांना रुमाल बांधणे, रोज केस धुणे टाळावे, तसेच खूप दिवस न धुतल्याने देखील केसांमध्ये कोंडा होऊ शकतो ज्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो. केस विंचरताना आधी मोठ्या दातांच्या कंगव्याने विंचरावेत त्यामुळे केस तुटण्यापासून वाचतील. लांब केस फार वेळ मोकळे सोडू नयेत.केस फार ताणून बांधू नयेत. फार गरम पाण्याने केस धुवू नयेत.
या सगळ्या जरी छोट्या गोष्टी वाटत असल्या तरी केस वाढीसाठी अत्यंत महत्वाच्या !!
अर्थातच इतकं सगळं सांगितल्यावर मनूचे तर समाधान झाले आणि स्वारी गेली की तयारीला . आता आपणही या गोष्टी नक्की अंमलात आणा.






1 टिप्पणी: